Astro Chitra
सर्व पोस्टVedic Astrologyमुख्य साइट
vedic-astrologyshanisaturnvedic-astrology

मी शनि बोलतोय...!

शनीचे कर्म, शिस्त आणि नशीबाबद्दल दृष्टिकोन ऐका. वैदिक ज्योतिषात शनी भीतीचे प्रतीक नाही तर वाढीचे मार्गदर्शक आहे हे जाणून घ्या.

A
AstroChitra१० जुलै, २०२६·14 min read
मी शनि बोलतोय...!

मित्रहो नमस्कार!

आज तुम्हा सर्वांशी संवाद साधावा अशी मला इच्छा झाली, मी मंद आहे; अशी माझी प्रचिती आहे. आज जरा जास्तच मंद म्हणजेच स्तंभी आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांबरोबर संवाद साधण्यास माझ्याजवळ वेळ देखील पुरेसा आहे.
भूतलावरील कुणालाही माझा परिचय नसेल असा नसेल कदाचित! तरीही संवाद साधायचा म्हणजे ओळख द्यायलाच हवी हा संकेत असतो. मी शनि, सूर्यपुत्र व यमाचा मोठा भाऊ. सूर्यमालेतील गुरु ग्रहानंतर आकारमानाने मोठा व कंकणाकृती वलयामध्ये विराजमान असतो.

सूर्यमालेतील आम्ही सर्व ग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा करता-करता स्वतःभोवतीही प्रदक्षिणा करीत असतो. सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास मला जवळ-जवळ ३० वर्षांचा कालावधी लागतो. स्वतःभोवती मी १० तास २४ मिनिटात ती पूर्ण करतो. मला दहा उपग्रह आहेत, तसेच क्रांतिवृत्तावरील एका राशीत मी जवळ-जवळ अडीच वर्षे वास्तव्य करतो. माझी उच्च रास तूळ आहे, तर नीच रास मेष आहे. माझी महादशा १९ वर्षांची असते.

मी वायूतत्त्वाचा प्रधान ग्रह असून, कालपुरुषाच्या कुंडलीत दशम व एकादश स्थानी म्हणजेच कर्म आणि लाभ या स्थानांवर माझे अधिपत्य आहे. तुमच्या शब्दात, व्यावहारिक उदाहरण द्यायचे झाल्यास कालपुरुषाच्या कुंडलीत मी एकटाच असा ग्रह आहे की, ज्याच्याकडे 'टू रुम किचन' चा प्लॅट आहे. माझे तीन नक्षत्रांवर स्वामित्व आहे, पुष्य, अनुराधा व उत्तरा भाद्रपदा. ही चतुष्पाद नक्षत्रे असून, ती कर्क, वृश्चिक व मीन या जलतत्त्वांच्या राशीत येतात. मी पश्चिम दिशेचा द्योतक आहे व माझ्या अधि आणि प्रत्यधिदेवता यम व विधी या आहेत. हा माझा परिचय. या विरुद्ध, तुम्ही बहुतांशी भूतलावरील लोक मला काही भूषणे देऊन माझा परिचय एखाद्या कुविख्यात गुंडाप्रमाणे केलेला आहे; उदाहरणार्थ शनि म्हणजे काळा, लंगडा, दुःख-दारिद्रयाचा कारक, काबाडकष्ट, कंजूष, नपुंसक, नाश-मृत्यूचा कारक; तर दुसऱ्या बाजूने शनि म्हणजे संशोधक, अर्थ-तर्क शास्त्रांचा कारक, दूरदृष्टीकारक, न्यायाधीश असे संबोधिता. साडेसातीदरम्यान तर मानवजात मला थरथर कापते, असा समज आहे. आज म्हणूनच मी तुम्हा सर्वांची ही विवंचना व गैरसमज दूर करण्यासाठी आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे.

प्रथमदर्शनी आणि अतिमहत्त्वाचे असे की, मी तसेच माझे इतर सहकारी ग्रह कोणीही स्वयंप्रकाशित नाही. जगरहाटीप्रमाणे ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू, तुमची पृथ्वीदेखील गतिमान आहे, म्हणजेच चलित आहे, सतत कर्म करीत आहे. आम्हा ग्रहांनापण त्यानुसार गती आहे, पण प्रकाश नाही; तो फक्त ताऱ्यांकडे आहे व तारे स्थिर आहेत. आम्ही फक्त त्यांचा (ताऱ्यांचा) प्रकाश आणि आमची गती यांचे मिलन करून ती किरणे तुमच्यापर्यंत पोहोचवतो, उदाहरणार्थ आणि तुमच्या भाषेत सांगावयाचे झाल्यास आम्ही फक्त पोस्टमनचे काम करतो. तुमच्या कर्माप्रमाणे निर्धारित असलेले शुभ अथवा अशुभ फळ तुमच्यापर्यन्त पोहोचवण्याचे कर्म अविरत करीत असतो, हा सर्वात महत्त्वाचा भाग मी प्रथम दर्शनी तुम्हाला सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे ग्रहांची शुभ अथवा अशुभ फळे मिळवणे हे तुम्हा मानवाच्या हातात आहे. 'जसे तुमचे कर्म तसा तुमचा भोग' ही बाब जर तुम्हास समजली आणि तुम्ही सर्वजणांनी ती प्रत्यक्ष जीवनात अवलंबली तर तुम्हाला मलाच काय, पण कोणत्याही ग्रहास भिण्याचे काही कारणच नाही! आता तुमचे एक-एक गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो.


शनि म्हणजे काळा :

क्रांती वृत्त ३६० अंशचे आहे व ते स्थिर आहे. ते बारा समान भागात विभागलेले आहे. त्यांना 'राशी' असे संबोधतात. ज्योतिषशास्त्रात रविला जरी ग्रह मानले असले तरी प्रत्यक्षांत तो एक तेजस्वी तारा आहे, आणि आम्ही इतर सर्व ग्रह (तुम्हास ज्ञात असलेले) त्याच्या मालिकेतील सहकारी आहोत.

पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरत असते. त्यामुळे पृथ्वीवर सूर्योदय-मध्यान्ह-दुपार-सायंकाळ-रात्र असे दिनमान होत असते, कारण पृथ्वीच्या या गतिमान प्रवासात या गोष्टींचा तुम्हास भास होतो. प्रथमतः सूर्य उदित होत नाही किंवा अस्तही पावत नाही. तो स्वयंप्रकाशित, तेजस्वी आणि स्थिर तारा आहे.
ज्योतिषशास्त्रात कालपुरुषाच्या कुंडलीत रविला पंचम स्थानाचे अधिपत्य दिलेले आहे व पंचमाच्या सप्तम स्थानाचा अधिकार माझ्याकडे आहे. पंचमाचे सप्तम स्थान (लाभ स्थान) म्हणजेच सूर्यदेवाची सातवी (७) दृष्टी, सरळ व प्रखर किरणे, दुपारची वेळ या गोष्टींचा संदर्भ लागतो. म्हणून शनि म्हणजे काळा, असे विशेषण तुम्ही मला दिलेत. मला तुमचा समज दूर करावयाचा नाही, पण तुमचे विचार किती भासमय आहेत, हे जाणून घ्यायचे असल्यास कधी वेळ मिळाला तर दुर्बिणीतून आकाशदर्शन करा आणि तुम्हीच ठरवा 'शनि काळा की विलोभनीय'.


शनि म्हणजे मंद / लंगडा :

आध्यात्मिक ग्रंथामध्ये लंगडा, तर ज्योतिषशास्त्रात मंद अशी तुम्ही सर्वांनी माझी प्रचिती करून ठेवली आहे. असो, तुमच्या माहितीसाठी आकारमानाने मी जवळ-जवळ तुमच्या पृथ्वी इतकाच आहे, पृथ्वी स्वतःभोवती २३ तास, ५६ मिनिटे आणि ४ सेकंदांत प्रदक्षिणा पूर्ण करते, तर मला स्वतःभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास १० तास २४ मिनिटे लागतात. तसेच मी रविपासून पृथ्वी ९३००३००० मैल दूर आहे तर मी पृथ्वीच्या अंतराच्या तुलनेत जवळ-जवळ ९ पटीने रविपासून दूर आहे. आता तुम्हीच ठरवा मंद कोण? तसेच मग हर्षल आणि नेपच्यून यांना काय म्हणतात अतिमंद?


शनि म्हणजे काबाडकष्ट :

याबाबतीत मी तुम्हा सर्वांशी पूर्णपणे सहमत आहे. ब्रह्मांडातील सर्व वस्तू / गोष्टी सजीव अथवा निर्जीव या सतत गतिमान आहेत. गती म्हणजे चलन आणि माझ्या जीवनतत्त्वातील ते प्रमुख तत्त्व आहे. तुमच्या भाषेत सांगायचे असेल तर फक्त गतीच तुम्हाला प्रगतीकडे नेऊ शकते. जीवनात कष्टाशिवाय काहीही श्रेष्ठ नाही, कष्टाचे फळ मिळत नाही, असे कधीही होत नाही. तुम्हा काहींना कष्ट न करता श्रेष्ठ होण्याची फार इच्छा असते त्यामुळे तुम्ही स्वतःच तुमच्या दुःखाचे कारण बनता. जीवनातील क्षणभंगुर सुख मिळवण्यासाठी कष्टाचा त्याग करून ऐषारामी जीवन जगण्याची तुमची धडपड कदाचित वाममार्गाने संपत्ती मिळवून तुम्हाला सुखी बनवेल, पण ते चिरकाल टिकणारे नाही. तसेच त्या वाममार्गाच्या कृत्याच्या फलादेशाला, तुमच्या कर्माच्या, जमाखर्च खात्यात तुम्हीच खतपाणी घालता व नवीन भोग भोगण्यासाठी बी पेरणी करून ठेवता, हे माहीत आहे का तुम्हाला? म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, मेहनत करा, सत्कर्म करा आणि श्रेष्ठत्वाला जा आणि कर्मफळाचा आनंद मेहेनतीतून, कष्ट करून घ्या. तोच चिरकाल टिकेल बाकी सर्व क्षणभंगुर.

उदाहरण द्यायचे झाले तर मी वडाचे व नारळाचे झाड यांचे देता येईल. वडाचे झाड जसजसे वाढत जाते (हॉरिझॉन्टल) तसतसे आपल्या फांद्यांतून ते भूमीच्या दिशेने जमिनीकडे पारंब्या सोडून आपले अस्तित्व अधिक बळकट करते व तुम्हाला दाट छाया देते; परंतु त्या दाट छायेमध्ये वनस्पती अथवा इतर झाडे वाढत नाहीत. त्याविरुद्ध नारळाचे झाड जणू काही असा संदेश देते की, तू स्वकर्तृत्वाने मोठा हो, त्यासाठी कष्ट / मेहनत कर आणि हाच अनुभव तुला माझ्या उंच शिरोभागापर्यंत पोहोचण्यास मदत करील आणि अशी मेहनत करून तू शिरोभागाला आलास तर तुला अमृततुल्य मधुर नीर निश्चितच मिळेल, पण त्यास कष्टाशिवाय पर्याय नाही.


दुःख-दारिद्र्य म्हणजे शनि :

दुःख आणि दारिद्र्याचे कारकत्व माझ्या नावावर लादून तुम्ही सर्वजण मुक्त झालात, असे वाटत नाही का तुम्हाला? अरे दुःख आणि दारिद्र्य ही मानसिकता आहे. आता म्हणाल मानसिकता म्हणजे काय? मानसिकता म्हणजे तुमच्या मनाची तुम्ही घडविलेली अवस्था. दुःख आणि दारिद्र्याची परिभाषा अथवा व्याख्या नाही, ही मनाने मानलेली/समजलेली एक स्थिती आहे. जर तुम्हाला तर्कशास्त्रातील थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी समजली असेल तर तुम्हाला या गोष्टीचा उलगडा पटकन होईल. समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेच आहे -

जगी सर्व सुखी असा कोण । विचारी मना तूचि शोधूनी पाहे ॥

तरी तुम्ही तिथेच! सुख आणि दुःख, दारिद्र्य आणि श्रीमंती म्हणजे काय, हे तुम्हालाच ठरवावे लागेल. त्यासाठी विधात्याने उपयुक्त बुद्धी तुम्हाला दिलेली आहे. अभ्यास करा आणि काहीही कारण नसताना उगाचच 'शनि म्हणजे दुःख-दारिद्र्य' असा दोष मला लावू नका. मी तर दाता आहे, तुम्हाला भरभरून देणारा आहे. तुमच्या कर्माची झोळी फाटकी असेल तर मी तरी काय करू? तरी बरे, काहींना हे समजले म्हणून त्यांनी काव्यातून जन-मनापुढे आपले विचार मांडले.

देणाऱ्याचे हात हजारो । दुबळी माझी झोळी ॥

आजच्या आधुनिक युगात मानवासारखा श्रेष्ठ प्राणी, पशूसारखे जीवन जगतोय. त्याला दारिद्र्य म्हणजे पैशाचा अभाव एवढाच अर्थ माहीत आहे, पण दारिद्र्य म्हणजे मनाचा कमकुवतपणा / कंजूषपणा हे आहे का ठाऊक? काही काळापूर्वी मी मानवाच्या जीवनातील गरिबीतील श्रीमंती पाहिली होती, पण आता तर तुम्ही बहुतांशी लोक धन, पैसा, श्रीमंती या भौतिक गोष्टींच्या इतके आधीन झाला आहात की, संस्कार आणि भावनांची आहुती देऊन श्रीमंतीचे लक्ष्य गाठण्यात तुम्हाला आनंद वाटतो. माझ्या मते असे श्रीमंत लोक, श्रीमंतीतले भिकारी आहेत. ह्या सर्व अनैतिक, वाममार्गी गोष्टी मला सहन होत नाहीत, कारण मी सत्यप्रेमी व न्यायाधीश आहे. मग अशा कुकर्म करणाऱ्या, अतिअभिमानी, गर्विष्ठ, कठोर लोकांना शासन केले किंवा दंड दिला की शनिच वाईट! तुम्हीच सांगा हे कितपत खरे आहे?

एक लक्षात ठेवा, या विश्वात काहीही शाश्वत नाही, मग लोभ कसला? लोभ आणि वासना तुम्हाला अनैतिक कामे करण्यास उद्युक्त करतात आणि त्यांच्या मायारुपी जाळ्यात तुम्ही अडकता. बहुतांशी दुष्कृत्ये करण्यास ते तुम्हास प्रवृत्त करतात, मग अशा कर्माचे फळ न्यायाधीशाने काय द्यावे? श्रीमंती आणि दारिद्र्य हे भूतलावरील क्षणभंगुर भौतिक विषय आहेत. त्यात चिंतीत असण्यापेक्षा आदिशक्तीच्या चिंतनाने चित्त शुद्ध करा, म्हणजे तुम्हाला दारिद्रयातिल श्रीमंती ही श्रीमंतीहून अधिक श्रीमंत वाटेल. तुम्हीच म्हणता अर्थ आणि तर्क शास्त्रांचे स्वामित्व माझ्याकडे आणि शनि म्हणजे दारिद्र्य काय हा विपर्यास!!


शनि म्हणजे मृत्यू / नाश :

कधीकधी मला तुमच्या विचारांची कीव येते. काय तुमचा अभ्यास आणि तसाच निष्कर्ष! विषयाचा मतितार्थ समजण्यापूर्वीच विधान करावयाचे आणि मोकळे व्हायचे हीच तुमची संकल्पना, असे वाटते. विधात्याने उत्पत्ती, स्थिती आणि लय या घटनांचा अविरत क्रम नित्य चालू ठेवला आहे, जीवन व मृत्यू ही जीवात्म्याची स्थिती आहे. जीवात्मा हा अमर आहे. तो एक अद्वैत शक्तीचा अंश आहे, म्हणजे जो जन्मला तो मृत्यू पावणार व जो मृत्यू पावला तो जन्मणार, हे अटळ आहे. कोण म्हणते 'मृत्यू म्हणजे नाश' ? भौतिक गोष्टींचे मायाजाल आणि तथाकथित पसरलेल्या विचारांमुळे 'मृत्यू म्हणजे नाश' ही कल्पना तुमच्या मनात घर करून बसलेली आहे. आज तुमच्या मनातील ही दृढ भावना पूर्णपणे बदलायची आहे. तत्पूर्वी संतांनी वर्णन केलेल्या एका अभंगाच्या दोन ओळी मांडतो, बघा काही समजते का ते?

जन्मा संगे मृत्यू । मृत्यू संगे जन्म ।
चक्र नेहमी क्रम ऐसा चाले । चक्र नेहमी क्रम ऐसा चाले ॥

पण तरीही मायेचे जाळे इतके दाट आणि तुमची दृष्टी तितकीच अधू, मग कसे समजवायचे? असो अजून एक उदाहरण देण्याचा प्रयत्न करतो, पाहूया कितपत समजते तुम्हाला. मृत्यू तसेच नाश ही जीवनाच्या रहाटगाड्यातील एक स्थिती आहे. जसे एखादे बीज भूमातेमध्ये स्वतःला मिसळून घेते तेव्हा ते फुटते व मातीमोल होते, तद्नंतर त्या बीजातून रोप निर्माण होते, म्हणजेच बीजाच्या नाशाचे रूपांतर रोपात व कालांतराने झाडामध्ये होते. आता सांगा नाश हे उत्पत्तीचे बीज आहे की उत्पत्ती हे नाशाचे उगमस्थान आहे.

जन-मनास भौतिक गोष्टीत आनंद मिळतो. हा आनंद क्षणिक असला तरी तो चिरकाल टिकून राहावा, अशी त्यांची मानसिकता असते तसेच तसा ध्यासही असतो, त्यामुळे अशा आनंदाचा लोप होऊ नये, नाश होऊ नये, अशी त्यांची धारणा असते. म्हणूनच ते नाश या स्थितीला घाबरतात, पण हे विसरतात की नाश हे उत्पत्तीचे उगमस्थान आहे.

मी वायूतत्त्वाचा प्रधान ग्रह आहे, आता आपण सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल बोलूया. समर्थांनी 'दासबोधा'तील १६ व्या अध्यायात वायुनिरूपण संबोधितले आहे. त्यात त्यांनी सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे वर्णिले आहे. पंचतत्त्वात वायूला अत्यंत महत्त्व आहे. वायू हे असे एकच प्रथम दर्जाचे तत्त्व आहे जे चराचरात सामावलेले आहे, म्हणूनच तुम्ही म्हणता, जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी वायू विराजमान आहे. पाण्यात मी, अग्नीत मी, आकाशात मी तसेच भूमीतही मीच. मी सर्वव्यापी आहे. चलन, वळण, प्रसरण, निरोधन व आकुंचन या सर्व अवस्थेत मी तुम्हाला सापडेन, यालाच प्राण, अपान, व्यान, उदान व समान असे संबोधतात. वायू हेच तत्त्व उत्पत्तीचे कारक आहे, त्यालाच आपण 'प्राण' असे संबोधितो. पंचतत्त्वांपैकी वायू हाच प्रथम ब्रह्मांडामध्ये प्रकट झाला, मग तो अनेक प्रकारच्या पिंडात प्रकट झाला. आकाशात राहणारे पक्षी वायूमुळेच उडू शकतात. देव, दानव, मानव, जलचर, वनचर, श्वापद या सर्वांत वायूच खेळत आहे. या विश्वात जेवढे प्राणी आहेत ते सारे वायूमुळेच जगतात, हालचाल करू शकतात. आगीचे लोळ वायूमुळेच उठतात. वायू प्रथम आकाशात मेघ भरतो मग लगेच त्यांना दूर लोटतो, वायूसारखा कारभार करणारा दुसरा कोणीही नाही, वायूची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. पर्वतांच्या माथ्यावरून ढगांचे दाट सैन्य लोकांच्या कल्याणासाठी वायूच जमवितो. मोठमोठ्या विजा कडाडतात आणि मग पाऊस पडतो हे सारे वायूचेच बळ. वायूच्याच बळाने पंचभूते एकमेकांत मिसळली आहेत. एवढेच काय, विश्वामधील सर्व उत्तम गोष्टीसुद्धा वायूमुळेच घडून आल्या आहेत. ज्या सूक्ष्म कमळामध्ये सृष्टीच्या निर्माणाचे कारकत्व घेऊन जो ब्रह्मदेव राहतो तो कमळकोष वायूरूपच आहे. पाण्यास त्याचाच आधार आहे, पाण्यातील शेषाने स्वशिरावर भूगोल धरला आहे व हाच वायू शेषाचा आहार आहे.

वायूमुळेच नाद, स्वर आहेत; संगीत, ज्ञान आहे आणि चराचर चलित आहे. विश्वातील सर्व कारभार एका अद्रुश्य शक्तीने चालला आहे आणि त्या शक्तीचे दृश्यस्वरूप म्हणजे वायू होय. अनेक विद्यांचा अभ्यास वायूमुळेच शक्य आहे. असे हे पंचतत्त्वातील महान वायूतत्त्व जे चराचरात व्याप्त असून, निर्मितीचे उगमस्थान व या तत्वज्ञानाचे प्रधानत्व मजजवळ आणि मलाच तुम्ही नपुंसक म्हणता! मला सांगा, तुमच्या भाषेत पुंसकत्व म्हणजे काय? आता म्हणाल जो उत्पन्न करतो तो, जो पोषण करतो तो; मग मी वायूतत्त्वाचा प्रधान ग्रह हे करत नाही का? तरीही मी नपुंसक कसा?


शनि साडेसाती - कर्दणकाळ :

हा तुमच्या आयुष्यातील फार अघोर तसेच भीतीदायक काळ, असा समज तथाकथित लोकांनी तुमच्या मनावर बिंबविलेला भयानक प्रकार आहे. प्रत्यक्षतः तसे नाही, या उलट साडेसाती म्हणजे सोन्याचे दिवस, या काळातच तुम्हाला जीवनाचे अंतिम लक्ष्य काय, तुम्ही प्रत्यक्ष काय आहात, तुमचे स्वतःचे स्वकीयांबरोबर काय महत्त्व आहे, कष्ट म्हणजे काय? या गोष्टींचा उलगडा होण्यास सहकार्य मिळेल.

मानवजन्म हेच मुक्तीचे एकमेव साधन आहे, तेथे हलगर्जीपणा दाखवून चालायचे नाही व तो मानवाच्या हातून घडू नये या सद्हेतूने प्रेरित होऊन साडेसातीच्या रूपाने तुम्हाला ज्ञान देण्याचा माझा प्रयत्न असतो. याच काळात मी तुम्हाला खऱ्या जगाची ओळख घडवून देतो, नवीन शिकवण देतो. काळाची ओळख स्पष्टपणे तुम्हाला करवून देण्याचे सामर्थ्य माझ्याइतके दुसऱ्या कुणाकडेही नाही. 'भोगा आणि मुक्त व्हा' असा संदेश मी देत असतो.

मी तुमचा शत्रू नाही. तुमच्यातील अहंकार, दुष्कृत्ये, समाजविघातक कृत्ये, ईर्ष्या, मत्सर हे माझे शत्रू आहेत, पण अज्ञानी जन संकटाने गर्भगळीत होऊन मलाच पापग्रह संबोधतात, केवढा हा विपर्यास! विधात्याने हे सुंदर विश्व बनविले आहे, ते तुम्हासाठीच आहे, त्याचा आनंद घ्या. दुष्कृत्ये करू नका आणि जर केलीत तर नियतीला दोष देत बसू नका.


गणित आणि अगणितात मीच :

गणित आणि अगणितात मीच आहे. पहा बरे शोधून. मी म्हणजे शून्य. ग्रहमंडळात मीच एकटा असा आहे, की जो शून्यात राहतो. माझ्या भोवतालचे विलोभनीय वलय हेच माझे शून्यात राहण्याचे द्योतक आहे. शून्याचा अभाव असेल तर गणित पूर्ण होणार नाही, तसेच अगणिताची अवस्थाही माझ्यामुळेच येते.

विषय निघालाच आहे म्हणून सांगतो की, गणितात कुठल्याही अंकाच्या उजव्या बाजूस शून्य मांडले की, अंकाची किंमत वाढते व डाव्या बाजूस शून्य मांडले की, किंमत तीच राहते, हा आजपर्यंत तुम्हा सर्वांस समजलेला गणित विषय. किती चुकीचे गणित करीत आहेत हे माहीत आहे का? बघा खरे काय ते - मी शून्य आहे, त्यामुळे माझ्याकडे कोणतीही गोष्ट अधिक किंवा उणे (+/-) अशी मोजली जात नाही. ज्या अंकाला स्वतःची किंमत वाढवून घ्यायची असते तो माझ्या वामस्थानी येतो. मी माझे स्थान बदलत नाही. तो अंक आपल्या स्वार्थाप्रमाणे स्थान बदलून माझ्या युतीत (शून्याच्या) आपली किंमत ठरवितो. झाला तुमचा भ्रम दूर? की अंकाच्या मागे शून्य लावले तर अंकाची किंमत वाढते, आता वाक्यप्रचार बदला.

चला आता निघायला हवे, तरीही जाता-जाता एक महत्त्वाचा संदेश. कालपुरुषाच्या कुंडलीत दशमभाव व एकादश भाव म्हणजेच कर्म आणि लाभ यांचे कारकत्व विधात्याने माझ्याकडे सोपवले आहे. प्रथम स्थानापासून दशम स्थानापर्यंत तुमच्या भूतलावरील कर्माचा हिशोब न्यायाधीशाच्या रूपाने मी तुम्हा जातकांना लाभस्थानातून देत असतो. मनुष्यजन्म हाच एक मुक्तीचा मार्ग आहे आणि जीवन एक रहाटगाडगे आहे. जर तुमचे कर्म फळ शुभ असेल तर येणाऱ्या जन्मात तुमच्या कुंडलीत, मी तुम्हाला सुस्थानातच आढळेन, अन्यथा निःसंदेह अशुभ कर्माचा अशुभ फलादेश देण्यासाठी अशुभ स्थानात असेन. मला प्रसन्न करण्यासाठी कोणतीही पूजा-अर्चा, यज्ञ-याग करण्याची गरज नाही. आपले कर्म सुधारले तर मला घाबरण्याचे काही कारण नाही. कधी शनिमाहात्म्य वाचले आहे का? त्यात माझ्या गुरूचा एक दृष्टांत दिला आहे. जेव्हा गुरूला अभिमान झाला होता तेव्हा त्यांचे गर्वहरण करण्यासाठी तेही माझ्या तावडीतून सुटले नाहीत. मी तुम्हा सर्वांपासून दूर अंतरावर आहे, म्हणूनच की काय, विधात्याने मला ३-७-१० दृष्टी देऊन न्यायाधीशाचे कार्य सोपविले आहे.

३-७-१० दृष्टी म्हणजे क्रांतिवृत्तावरील ३६० अंशांपैकी २४० अंशांवर माझी पूर्णपणे नजर असते व हे मला मजभोवती असलेल्या कंकणामुळे साध्य होते. आता राहिले कुंडलीतील ११, १२, १ व द्वितीय स्थान. त्यांचे असे आहे की, एकादश स्थानाचे, कालपुरुषाच्या कुंडलीतील कारकत्व माझ्याकडेच आहे, त्यामुळे वेगवेगळ्या दृष्टीची गरज नाही. तसेच द्वादश स्थान म्हणजे व्ययस्थान हे लाभस्थानानंतर येते, त्यामुळे एकादश स्थानातून तुमच्या कर्माचा न्यायनिवाडा झाल्यावर व्ययस्थानात दृष्टी टाकण्याचे कारणच उरत नाही. आता राहिला प्रथम व द्वितीय भाव, तुम्ही स्वतः व कुटुंब. तुम्ही स्वतः कसे असाल व तुमचे कुटुंब कोणते असेल, हे तुम्हीच तुमच्या गतजन्मातील कर्मामुळे ठरविलेली बाब आहे. त्यासाठी तिथेही मला दृष्टी टाकण्याची गरज वाटत नाही, कारण तो भाग मी तुमच्या गतजन्मीच्या, कर्मफळाचा जमाखर्च मांडल्यावर तिथेच ठरविला होता. तदनंतर तृतीय स्थान (पराक्रम) ते दशम स्थान (कर्म) येथे मी तुमच्या कर्मावर पूर्णपणे लक्ष ठेवून असतो, म्हणूनच मला विधात्याने 'न्यायाधीश' असे संबोधिले आहे.

तुमच्या सर्वांपासून दूर अंतरावर राहतो मी, पण तुमचाच स्नेही आहे. माझे अस्तित्व किती महत्त्वाचे, मोठे आहे त्यापेक्षा तुमच्यामुळे मी महत्त्वाचा व मोठा आहे, मला माझ्या मोठेपणाचा अथवा लहानपणाचा अहंकार किंवा खंत नाही. मी स्थितप्रज्ञ आहे, कारण मी शून्यात राहतो. अहंकार, लोभ, दुष्कृत्ये, अति-आसक्ती, मत्सर, समाजविघातक कृत्ये या सर्वांपासून दूर राहून, दीन-दुबळ्यांची सेवा, जनहिताची निष्काम कर्मे, समाजाप्रती तसेच वडीलधाऱ्या मंडळींसंबंधी आपल्या नैतिक जबाबदाऱ्या परिपूर्ण करा. अशा वर्तनाने मीच काय, विश्वातील कोणताही न्यायाधीश तुमच्यावर अन्याय करणार नाही. मनुष्यजन्मात कर्तृत्वाला भरपूर वाव आहे, अन्य कोणत्याही जन्मात हे शक्य नाही, हेच काय जे मानवाला शक्य आहे, ते देवांनाही शक्य नाही. उदा. काही पुरोणोक्त स्रोतांत तुम्हाला वाचावयास मिळाले असेल. 'इति देवानामपि दुर्लभम्'!

असो, आता निघतो. पण माझा संदेश लक्षात ठेवा. तदनुसार वर्तन करा आणि मनुष्यजन्मातच उद्धार करून घ्या, नाहीतर आहे....

पुनरपि जननं पुनरपि मरणं ।
पुनरपि जननी जठरे शयनं ॥

A
Astrochitra
AstroChitra Journal हे वैदिक ज्योतिष, कुंडली विश्लेषण, ज्योतिष, रत्नशास्त्र आणि आध्यात्मिक उपायांसाठी एक व्यापक ज्ञान भंडार आहे.

टिप्पण्या